Sunday, August 3, 2014

Lights...Camera...Action !

14th June, 2014. I started my column 'Short Cut' on this day, introducing some good short films from the huge world of short films to the readers of Prahaar, Marathi newspaper. Though before this I wrote plenty for newspapers and other mediums, I never had my own regular weekly column. Watching films is always a pleasure and so is the writing about short films. I frequently search for good short films, and one day I saw the short film  'Kamera' by Nijo Johnson. I thought why should not start my column with this nice Indian short film. It tells the story of two rag picker boys. There is a published article & video of short film in the given links.Very soon I will translate my reviews here.  
-------------------------------
                                                 

क कॅमे-याचा..

एखाद्या पूर्ण लांबीच्या सिनेमाला पुरेल इतक्या आशयाचा विषय घ्यायचा आणि त्याला अवघ्या १० ते ३० मिनिटांत मांडायचं म्हणजे आव्हानच. तंत्रज्ञ, कलाकार, लेखक, कॅमेरामन, दिग्दर्शक अशा सर्वाचीच प्रतिभाशक्ती पणाला लागते असं सिनेमाचं लघुरूप म्हणजे शॉर्टफिल्मस्. याचा पसारा आणि जीव छोटा असला तरी विषय मांडण्यात व रंजकतेत शॉर्टफिल्मस् कुठेही कमी पडत नाहीत. शॉर्टफिल्म म्हणजे जणू क्रिएटीव्हिटी तासण्याची कानसच. अगदी नामवंतानाही शॉर्टफिल्म करण्याचा मोह आवरत नाही. त्यातूनच छोटय़ा कथांना जोडून मोठा चित्रपट बनवण्याची पद्धत आलेली. तरीही शॉर्टफिल्मस्चं जगच वेगळं आणि त्यांचे फॅन असणारे प्रेक्षकही वेगळे. शॉर्टफिल्मचा कॅनव्हास छोटा वाटत असला तरी अल्पखर्चात व कमी वेळेत एखादा विषय प्रेक्षकांसमोर मांडायचा असेल तर शॉर्टफिल्मला पर्याय नाही. आपण या सदरातून विविध फिल्म फेस्टिव्हल्समध्ये सादर होणा-या व इंटरनेटवर पहायला मिळणा-या शॉर्टफिल्म्स विषयी जाणून घेणार आहोत.
 
अर्जुन एक नऊ-दहा वर्षाचा मुलगा. तो या शॉर्टफिल्मची लेन्सच आहे जणू. कॅमेरा त्याच्या हालचालींसोबतच फिरतो. त्याच्या आयुष्यातले दिवस चाललेत असेतसे. पण त्याची काही तक्रार नाहीये. त्याच्या वयाप्रमाणे तो खुष आहे. आई तेवढी दम भरत असते, तिच्याकडे मात्र तो लगेच लक्ष देत असतो. कारण त्याला माहितेय की आई गरिबीनं गांजलेली आहे पण आपल्याला चांगलं ठेवण्यात, काळजी घेण्यात ती काही कसर ठेवणार नाही. म्हणूनच तर वडिलांनी पोरका केलेला अर्जुन अगदीच रस्त्यावर अनाथ होऊन आलेला नाही. शाळेत जाण्याऐवजी त्याचं लक्ष माकडचाळ्यांकडेच अधिक. आईचा ओरडा यासाठी त्याला नेहमीचाच. त्यालाही सवय झालीय. पण आईच्या चेह-यावर हसू नाही ही गोष्ट मात्र त्याला नेहमी खंतावणारी.
आईला मनवणं सोपं असलं तरी हसवणं कठीण आहे हे त्याला कळून चुकलंय. त्याची कारणंही त्याला माहित आहेत पण कारणांचं गांभीर्य समजण्याइतका तो मोठा नाही झालेला. दिल्लीच्या रस्त्यांवर बसणा-या डोंबा-यांच्या खेळात शिरुन, चेह-यावर मिशा वगैरे रंगरंगोटी करुन घ्यायची आणि ट्रॅफिक सिग्नलला उभ्या असणा-या गाडय़ांच्या काचेतून आतल्या श्रीमंतांकडे भीक मागायची हा त्याचा छंद. हज्जारवेळा आईने सांगून झालं असेल त्या डोंबा-यासोबत जाऊन रस्त्यावर भीक मागण्याचे खेळ करायचे नाहीत म्हणून पण अर्जुनच्या जीवाला कुठं पटतंय ते. लोक आपल्या रंगवलेल्या चेह-याकडे बघून हसतात याच समाधानापायी तो हे खेळ करतो. गाडीतली एखादी तरुणी याच्याकडे पाहून हसली की स्वारी खूष! आपण लोकांना हसवू शकतो एवढय़ाच आनंदात हा राहणार. मला फक्त असे विदूषकी चाळे करुन लोकांना हसवण्यातच रस आहे आणि आयुष्यात मी हेच करणार हे देखील त्यानं आईला बजावून सांगितलंय, तिला न घाबरता. पण या वेडगळ चाळ्यांना आईचा सक्त विरोध. आईचं जपणं याला अजुन तितकंसं कळलेलं नाही. पण आईला मुलानं असले काहीतरी निरुद्योग न करता चार पैसे मिळतील असं काही करावं असं वाटतंय. तिच्या रागावण्यानेच मग अर्जुनची शेजारच्या मित्राबरोबर डंपिग ग्राऊंडवर भटकंती सुरू होते.
या कचरा वेचण्यातून दिवसाकाठी फार काही हाती लागणार नाही हे त्या दोघांनाही माहितेय. पण एकमेकांच्या सहवासासाठी, मैत्रीसाठी हा वेळ चांगला वाटतो त्यांना. पण कचरा वेचताना हिरे-माणकं नाही सापडत पण काही मौल्यवान सापडू शकतं याची जाणीव असल्यानेच ही दुक्कल इमानेइतबारे कचरा धुंडाळते. अन् एक क्षण असा येतो की अर्जुनला आयुष्यात काही ध्येय सापडलंय असं वाटतं. दोघं हर्षभरीत होतात. हा असतो एक डिजिटल कॅमेरा. त्यांच्या भाषेत कमेरा. हा कॅमेरा काय प्रकार असतो हे मित्र समजावून सांगतो आणि मग अर्जुनच्या डोक्यात हवामहल उभा राहतो. आईला एकदातरी हसवायचंच असं त्यानं ठरवलंय. आपल्याला ते जमलं नाही हा कॅमेरा ते काम नक्की करेल असा त्याला विश्वास आलाय. अर्जुन घरी कॅमेरा घेऊन आलाय. आईचा फोटो काढण्यासाठी व तिला हसवण्यासाठी उतावीळ झालेला अर्जुन. घरात (घर म्हणजे एक पत्र्याचं खोपटं) शिरल्या शिरल्या तिला फोटोसाठी तयार करण्याचा प्रयत्न करतो. पण आईने पहिले आंघोळ करुन ये म्हटल्यावर त्याला जावंच लागतं. तो गेल्यावर आई त्याच्या बॅगेत काय गोळा करुन आणलंय हे पाहण्यासाठी हात घालते व त्याचवेळी भंगारवाला दारात येऊन उभा राहतो..
यापुढे काय होतं हे पाहण्यासारखं आहे. अपेक्षित शेवट, त्यात काय पहायचं असं म्हणून सोडून द्यावी अशी ही शॉर्टफिल्म नाही. ही बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्येही दाखवली गेली. शॉर्टफिल्मस्साठी मोठय़ा फिल्म फेस्टिव्हलमध्ये एंट्री मिळणं हिच मोठी भाग्याची गोष्ट असते. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक भारतीय सिनेमा, शॉर्टफिल्मस्, अल्बम्स नावाजले जातात. त्यातील अगदी मोजक्याच फेस्टिव्हल्सची, स्पर्धाची आपल्याला नावं माहित असतात. त्यामुळे उत्तम अशी प्रत्येक शॉर्टफिल्म प्रेक्षकांपर्यंत पोहोचतेच असं नाही. सिनेमाच्या बाबतीत ही गोष्ट वेगळी असते. सिनेमा कुठल्यातरी थिएटरमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोच. पण शॉर्टफिल्मस्बाबत असं होत नाही. शॉर्टफिल्मस् लोकांपर्यंत विविध मार्गानी न्याव्या लागतात. इंटरनेटचा त्यात मोठा उपयोग होतो. शॉर्टफिल्मस्च्या जगातील हजारो शॉर्टफिल्मस् आज वेबसाईट्सवर पहायला मिळतात. सर्वच चांगल्या असतात असं नाही, पण चांगल्याचा शोध नेहमी आपल्यालाच घ्यावा लागतो.
निजो जॉन्सनची ही शॉर्टफिल्म अशा चांगल्या शॉर्टफिल्मपैकीच एक. शॉर्टफिल्मची कथा ही शक्यतो वनलाईन स्टोरी असते. त्याप्रमाणे आईच्या चेह-यावर हसू आणण्यासाठी चाललेली एका मुलाची धडपड अशी याची कथा सांगता येईल. सुमारे १७ मिनिटांची ही शॉर्टफिल्म. निजो आणि त्याचा मित्र रोहित आर. गाबा यानं ही प्रोडय़ुस केली. या दोघांनी ‘स्लमडॉग मिलेनिअर’ व इतर काही चित्रपटांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. या शॉर्टफिल्मचं कथा, पटकथा व दिग्दर्शन निजोचंच. ‘पुरानीदिल्लीटॉकिज’ या त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसतर्फे तिची निर्मिती झाली. कुठेही कंटाळवाणी नाही. छोटे आणि समर्पक कट्स. कलाकारांचा नैसर्गिक सहज अभिनय व वेगवान कॅमेरा ही शॉर्टफिल्म पाहताना अधिक मजा आणतो. आनंद, आशा, तडजोड, अपेक्षाभंग अशा सर्व भावना सहजगत्या दिसून जातात. विषय भावनांना हात घालणारा असला तरी मेलोड्रामॅटिक अजिबात झालेला नाही. किंवा अगदी बालचित्रपटाचा फिलही त्याला नाही. किंवा भारतीय दारिद्रय़ात गुंतून जाणाराही नाही. २०११ साली बनलेली ही शॉर्टफिल्म अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर केली गेली. २०११ साली नागपूरला झालेल्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ती विजेती ठरली.
बरं, या शॉर्टफिल्मचं नाव आता नाही सांगणार, मुद्दामहूनच. तुम्ही ती शोधावी आणि शोधताना थोडी अधिक गंमत यावी म्हणूनच. तसं नाव ओळखणं अगदी सोप्पं आहे, कारण ते कथेतच आहे. इथे नाव कळेल पण पुढल्यावेळी. नव्या शॉर्टफिल्मबद्दल वाचू तेव्हा.
Link of published article- http://prahaar.in/relax/221482
Link to the short film- http://youtu.be/Y0nPCc1ZpIY