Thursday, September 14, 2017

शॉर्ट फिल्म्सच्या दुनियेत (World of short films)

                                

सिनेमा माध्यमातलाच एक उपविभाग म्हणजे शॉर्ट फिल्मस् किंव लघुपट. दोन-अडीच किंवा अगदी साडे तीन तासांचा चित्रपटही प्रेक्षक न कंटाळता पाहतात परंतु कोणत्याही पूर्ण लांबीच्या सिनेमाइतक्याच मनोरंजक आणि तंत्रकौशल्य असणा-या शॉर्ट फिल्मसकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोन मात्र निराळा असतो. चित्रपटांइतक्याच हमखास आवडीने लघुपट पाहिले जात नाहीत. वास्तविक एखाद्या मोठ्या चित्रपटाला पुरेल इतक्या आशयाचा विषय घ्यायचा आणि त्याला अवघ्या १० ते ३० मिनिटांत मांडायचं म्हणजे आव्हानच असतं. तंत्रज्ञ, कलाकार, लेखक, छायाचित्रणकार, दिग्दर्शक अशा सर्वांच्याच प्रतिभाशक्तीची जिथे कसोटी लागते असं सिनेमाचं लघुरूप म्हणजे शॉर्ट फिल्मस्. जॉर्ज लुकास, टिम बर्टन, जॉन लॅसेस्टर, वेस अँडरसन यांसारख्या कित्येक नामवंत दिग्दर्शकांच्या चित्रपटसृष्टितील करिअरचा पाया शॉर्ट फिल्ममधूनच घडलेला आहे. लघुपटांचा पसारा आणि जीव छोटेखानी असला तरी विषय मांडणीत व रंजकतेत शॉर्ट फिल्मस् कुठेही कमी पडत नाहीत. शॉर्ट फिल्म म्हणजे जणू बुद्धि आणि प्रतिभा तासण्याची कानसच. आताच्या भाषेत सांगायचं तर चित्रपटांच्या विद्यापीठात प्रवेश घेण्याआधी द्यावी अशी सीईटी! अगदी नामवंतानांही लघुपट बनवून पाहण्याचा मोह आवरत नाही. आपल्याकडेही सुजॉय घोष, नीरज घेवन, अनुराग कश्यप, सुधीर मिश्रा, फरहान अख्तर या दिग्दर्शकांनीही शॉर्ट फिल्मस् बनवल्या आहेत. हल्ली तर अशा छोट्या कथांना जोडून मोठा चित्रपट बनवण्याचाही ट्रेंड येऊन गेलेला आहे. तरीही शॉर्ट फिल्मचं जगच वेगळं आणि त्यांचे चाहते असणारे प्रेक्षकही वेगळेच. लघुपटांचा कॅनव्हास छोटा वाटत असला तरीही अल्पखर्चात आणि कमी वेळेत एखादा विषय चित्रपटाच्याच ताकदीने प्रेक्षकांसमोर मांडायचा असेल, त्याचा दीर्घकाळ परिणाम व्हावा असं वाटत असेल तर शॉर्ट फिल्म्सना पर्याय नाही. शॉर्ट फिल्मसाठी कथानक खूप नेटकं व अगदी वनलाईनर म्हणता येईल अशा प्रकारातलं असावं लागतं. मग या वनलाईनर कथेवर दिग्दर्शकाला खेळायचं असतं. त्यातच तर खरी मजा असते. शॉर्ट फिल्मचं वैशिष्ट्य त्यांच्या साधेपणातच असतं. मोठ्या चित्रपटांइतकं बजेट व दिखावा दोन्ही त्यांच्याकडे नसतं. शॉर्ट फिल्मस् बनवण्यातला एक आनंद म्हणजे वैविध्य. अनेक विषय वेगवेगळ्या पद्धतीने मांडून हे वैविध्य त्यात राखता येतं. रुपेरी पडद्याच्या भाषेत लिहिलेली कलाकृती ही एक प्रकारे अजरामरच असते व ती उत्तम असेल तर रसिकांच्याही मनात कायमचं घर करून राहते. प्रेक्षकांच्या मनात असं स्थान मिळवण्यासाठी हजारो शॉर्ट फिल्ममेकर्स प्रयत्न करत असतात. हे सतत प्रयोगशील राहाण्याचं एक माध्यम आहे. इथे नावीन्य आजमावण्यासाठी आकाश अगदी मोकळं असतं. तरूणांना शॉर्ट फिल्मचं हे माध्यम नेहमीच आव्हान देत असतं. आशय मांडणीत व चित्रांकनात लघुपटांचं सारं यश सामावलेलं असतं.
This article has been previously published in Maharashtra Dinman newspaper on the date 03/04/2017

Tuesday, January 31, 2017

The Piano Tuner

One never know what is waiting in future ! Adrien is a young pianist prodigy. After losing a renowned competition he lost his confidence too and starts working as a piano tuner.  His creativity do worst him next as he pretends to be a blind teacher for certain causes but since he sees things he should not see, Adrien caught himself in a situation to witness a murder.

करायला गेलो एक..

एखादी शॉर्ट फिल्म एकदा पाहायला सुरुवात केल्यावर कंटाळा न येता पुढे पाहात राहावी असं नेहमीच प्रेक्षकांना वाटतं. अर्थात सर्वच शॉर्ट फिल्म्समधून प्रेक्षकांची ही अपेक्षा पूर्ण होत नसते. त्यामुळे साधारणत: समान कथाकल्पना असणा-या अनेक शॉर्ट फिल्म्स पाहायला मिळतात. थोडक्याच वेळात प्रेक्षकांना एकवेळ रडवणं किंवा हसवणं सोपं परंतु एखादी थरारक, रोमांचक कल्पना घेऊन, तिच्यातलं नाटय़ ताणून एखादी थ्रिलिंग शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या पसंतीस येईल अशी बनवायची म्हणजे कठीणच.
                                             

जी गोष्ट आपल्याला येत नाही ती करायला गेलेल्या अनेकांनी जीव गमावल्याची उदाहरणं रोजच्या रोज पाहायला मिळतात. एकप्रकारे ही माणसं आत्मविश्वासाशी विनाकारण खेळच करत असतात. केवळ दुस-यांशीच नव्हे तर स्वत:शीच ही माणसं खोटं बोलत असतात. कुठलीही गोष्ट, मग ते एखादं कसब असेल किंवा एखादं विधान असेल किंवा एखादं कृत्य असेल, जे आपलं नाही, जे आपण केलं नाही तरी आपणच केलंय असं भासवायचं म्हणजे खोटयाचा आधार घेणं. अशी माणसं तात्कालिक यश मिळवतात पण पुढं गोते खातात. खोटं बोलणं, असं वागणं ही देखील एक कला आहे असं म्हणतात. ते सर्वानाच जमतं असं नाही. नाही जमलं तर अशा खोटया बोलण्यातून काय काय बिलामती येऊ शकतात हे आतापर्यंत अनेक चित्रपटांतून आपण पाहिलं आहे. हृषिकेश मुखर्जीच्या ‘चुपके चुपके’मधला अमिताभनं रंगवलेला बायॉलॉजीचा प्रोफेसर व ड्रायव्हर झालेला धर्मेद्र आठवतोय ना.. तर असे खूप चित्रपट झालेत. गुजरातीत एक म्हणदेखील आहे.. जेनु काम तेनु थाय, बिजा करे सो गोता खाय.. तर असं हे खोटं बोलणं कधीकधी जीवावरदेखील बेतू शकतं. अर्थातच जी गोष्ट आपली नाही, ती आपली असल्याचं नाटक करणं किंवा बतावणी करणं म्हणजे असत्याचे डोंगर रचत केलेला खेळच की. मग हा डोंगर, ज्याला सत्याचा पायाच नाही तो कधीतरी कोलमडणारच ना.
चित्रपटांमध्ये तर खूप प्रकारच्या जॉनरमध्ये खोटे बोलण्यातून निर्माण होणा-या मनोरंजनाचा वापर करून घेतलेला आहे. ‘द पियोनो टय़ूनर’ नावाच्या थ्रिलर शॉर्ट फिल्ममध्येही असत्यातून एका तरूणावर जीव गमावण्याची पाळी कशी येते हे दाखवलं आहे. फ्रेंच भाषेतली ही २०१० सालची शॉर्ट फिल्म. आद्रिए हा उत्कृष्ट पियानिस्ट म्हणजे पियानोवादक. एका अत्यंत प्रतिष्ठीत स्पर्धेत तो भाग घेतो, पण ऐनवेळी पियानोच्या तारा अडकून बेसूर उमटतात व त्याच्या हातून प्राईझ निसटतं. या स्पर्धेसाठी खरं तर त्यानं खूप मेहनत घेतलेली. मात्र ते मिळत नाही तेव्हा हा नैराश्यात जातो. त्याची जगण्याची उर्मीच नाहीशी होते. अगदी पियानो वाजवूच नये असं त्याला वाटतं. काही दिवस घरात काढल्यानंतर अखेर नाईलाजानं तो जगासमोर येण्याचा निर्णय घेतो. परंतु क्रिएटीव्ह असल्याने त्याच्याही डोक्यात चित्रविचित्र कल्पना असतातच. त्यामुळेच यापुढे पियानो तर वाजवेन पण अंध पियानो टय़ूनर म्हणूनच बाहेर वावरेन असा हट्ट तो सुरू करतो. अंध माणसाच्या डोळ्यांसारख्या हुबेहूब दिसणा-या लेन्सेस घालून लोकांच्या घरी अंध पियानो टय़ूनर म्हणून जाण्याचं नाटक करण्याचा त्याचा बेत तो जाहीर करतो. त्याचा संगीत संयोजक व मालकाशीही तो या मुद्दयावर हुज्जत घालतो.
आंधळा झाल्यावर आपोआपच माझा संगीताचा कान व इतर संवेदना या इतरांपेक्षा उत्तम असणार अशी लोकांची भावना होईल अशी याची समजूत. तसंच अंधांशी लोक अधिक मोकळेपणाने वागतात व त्यांना पैसेही थोडे जास्त देताना मागेपुढे पाहत नाही याचाही त्याला फायदा घ्यायचाय. शिवाय अंध असल्याने कोणी त्याच्यावर कसलीही शंका घेणार नाहीत व लोक त्याचं अधिक कौतुक करतील असंही आद्रिएला वाटतं. तो हॉटेलपासूनच या अंधपणाचे प्रयोग सुरू करतो. रस्ता क्रॉस करताना तालीम करतो. लेन्स लावून अंध व्यक्ती बनण्याचे त्याचे प्रयत्न सुरू होतात.
डोळस पियानिस्ट बनून जे यश मिळालं नाही, ते यश व फायदे आता त्याला अंध पियानो टय़ूनर बनून मिळवायचे असतात. हळुहळू त्याचे ग्राहक वाढतात. हा प्रयोग यशस्वी ठरतो. लोकांना त्याच्या अंध नसण्याची अजिबात शंका येत नाही. इतकं की एक तरुणी तो पियानो वाजवत असताना अर्धवस्त्रांमध्ये त्याच्यासमोर नृत्यही करते. पण एक दिवस हा चांगलाच गोत्यात येतो. जणू स्वत:च्याच हाताने स्वत:च्या पायावर कु-हाड मारून घेतो. तो एका घरी पियानो टय़ूनिंगसाठी जातो व त्याचं आयुष्यच तिथं संपून जातं. अर्थात हे सर्व कसं घडतं याची रोमांचक गोष्ट इथं सांगितली तर त्यातलं सारं थ्रिल जाईल. पण आद्रिएच्या खोटया वागण्यातून त्याच्यावर पस्तावण्याची वेळ कशी येते हे नक्कीच पाहण्यासारखं.
दिग्दर्शक ऑलिव्हिएर त्रिनिएर यानं या छोटयाशा कथेतून ही एक मस्त थोडी थ्रिलर, थोडी ब्लॅक कॉमेडी टाईप शॉर्ट बनवली आहे. त्याची ही पहिलीच शॉर्ट फिल्म, पण विविध फिल्म फेस्टिव्हल्समध्ये तिला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ५० हून अधिक बक्षिसं या शॉर्टला मिळालीत. दिग्दर्शक ऑलिव्हिएरने फ्लॅश फॉरवर्ड तंत्राचा छान वापर करत कथेचं सादरीकरण रंजक केलं आहे. हिचकॉकच्या चित्रपटातील एखाद्या पात्राप्रमाणे पात्र घेऊन खोटं बोलण्याविषयी एखादी फिल्म बनवावी असं त्याच्या मनात होतं. तसंच एकटया पात्राभवती फिरणारी व थोडक्या वेळेतच संपणारी छानशी शॉर्ट त्याला बनवायची होती. त्याच्या व प्रेक्षकांच्या सर्व अपेक्षा ही शॉर्ट फिल्म पूर्ण करते.