Monday, June 8, 2015

'8' by Acim Vasic-Serbian war short

War Shorts have always attracted me. Though the subject is serious some makers have presented war shorts enveloped in humor & thrill.  '8' by Acim Vasic is one of them, great to see. He is a Serbian short film maker and his dark humor is well presented in this short. 
           
विनोद, उपहास हा प्रकार शॉर्ट फिल्ममधून मांडणं हे सर्वात कठीण काम. त्यातून तो ब्लॅक किंवा डार्क ह्यूमर असेल तर प्रेक्षकांपर्यंत नेमक्या टाईमफ्रेममध्ये बसवून पोहोचवणं म्हणजे कसबी दिग्दर्शक हवा. एका सर्बियन दिग्दर्शकानं हे आव्हान पेललं व प्रेक्षकांना एक अफलातून वॉर शॉर्ट पहायला मिळाली. उत्तम स्क्रिप्ट, पटकथा, बांधणी, तंत्र, नाविन्य, अभिनय, पाहताक्षणी खिळवून ठेवणारी सुरुवात, शॉर्ट फिल्मला लावल्या जाणा-या अशा सर्वच निकषांना ही शॉर्ट फिल्म सहज पार करते. उपरोध, दु:ख, आशा-निराशेचा लपंडाव, हार-जीत, वैफल्य अशा सर्व भावनांची अवघ्या काही मिनिटांमध्ये विलक्षण मांडणी यात दिसते.
                                          
मागील लेखात आपण जी शॉर्ट फिल्म पाहिली होती, तिचं नाव खरं तर पूर्ण लेखात अनेकदा वापरलं गेलं होतं, तुम्ही कदाचित ते शोधून काढून ती शॉर्ट फिल्म पाहिली देखील असेल, तर तिचं नाव होतं...कमेरा. म्हणजे कॅमेरा. दिग्दर्शकानं कचरा वेचणा-या मुलाच्या भाषेतलं शीर्षक हवं म्हणून कमेरा हेच शब्द वापरले होते. ती शॉर्ट फिल्म पाहिल्यावर लक्षात आलंच असेल की एकूणच विषयाचा पसारा खूप मोठा नसला तरीही एखादया छोट्याशा गोष्टीला घेऊन उत्कृष्ट शॉर्ट फिल्म बनवता येते. शॉर्ट फिल्म हे ख-या अर्थानं प्रयोगशील कलाकारांसाठी म्हणजे दिग्दर्शक, तंत्रज्ञ, व अशा अनेकांसाठी एक मोठं दालनच आहे. मोठ्या पडद्यावरील सिनेमाप्रमाणेच निरनिराळे विषय इथे हाताळता येतात. अगदी युद्धासारख्या गंभीर विषयावरदेखील शॉर्ट फिल्म्स् बनलेल्या आहेत. इंटरनेटवर एक सर्च मारला तर हजारो वॉर शॉर्ट पहायला मिळतील. वॉर शॉर्ट म्हणजे युद्धावर आधारीत शॉर्ट फिल्म्स्. शॉर्ट फिल्मला या इंडस्ट्रित कधी कधी संक्षिप्त स्वरुपात नुसतं शॉर्ट असंही म्हटलं जातं.
 वॉर फिल्म्सप्रमाणे शॉर्ट फिल्म्सच्या जगातही वॉर शॉर्ट लोकप्रिय आहेत. त्यापैकीच एक जरा वेगळी वॉर शॉर्ट म्हणजे . हिचं नाव म्हणजे आठ आकडा. अंत नसलेल्या युद्धाचं ते एक प्रतिक. सर्बियन दिग्दर्शक असिम वासिक याची ही शॉर्ट फिल्म म्हणजे शॉर्ट फिल्ममधून डार्क ह्यूमर देखील कसा दाखवता व मांडता येतो याचा उत्तम नमुना आहे. तो स्वत:च या शॉर्ट फिल्मचा लेखकही आहे. ही वॉर शॉर्ट त्यांनी स्वितर्झलँडमधील जंगलात शूट केली. सुरुवातीला फक्त टर्ब्युलन्स फिल्मस् हे नाव दिसतं आणि कॅमेरा फ्रेममध्ये येतो एक सैनिक. वरतून जाणा-या विमानाला थांबवण्याचा त्याचा अयशस्वी प्रयत्न. लढता लढता दूरवर आलेला, इतर सैनिकांपासून जंगलात एकाकी पडलाय तरीही चेह-यावर बेफिकीरी, तोंडात सिगरेट असा हा एक्स सैनिक. त्याला एक्स म्हणायचं कारण त्याच्या शिरस्त्राणावर एक्ससारखं दिसणारं चिन्ह आहे. पुढल्याच फ्रेममध्ये आकाशातून धप्पकन पडलेला, पॅराशूटच्या जंजाळातून स्वत:ला सावरत, शोधत बाहेर काढणारा दुसरा सैनिक. याला ओ म्हणायचं. कारण याच्याही हेल्मेटवर ओ अक्षरासारखं दिसणारं चिन्ह दिसतंय. या एक्स व ओ नावांमध्येही गंमत आहे. ती पुढं लक्षात येते. अर्थातच हा एक्सच्या शत्रूपक्षाचा सैनिक आहे. याच्याकडे पाहिल्यावरच लक्षात येतं की स्वारी थोडीशी मवाळ आहे. एक्सनं लांबूनच याला पाहिलंय. तो बर्फातून चालत ओच्या पाठी येऊन उभा राहतो. यानंतरचा प्रसंग म्हणजे अफलातून टेकिंगचा नमुना आहे. तो इथं सांगून फायदा नाही, ते बघण्यातच मजा आहे. यानंतर सुरु होतो एक उंदीर-मांजराच्या पाठशिवणीसारखा खेळ. बर्फाळ प्रदेशातील या पूर्ण जंगलात ते दोघंच आहेत. पण युद्धाची नशा काही अजून उतरलेली नाही. त्यामुळे अस्तित्व संपून जायची वेळ आली तरी ते त्यांच्या सैनिकधर्माप्रमाणे वागतायत. एक्सनं या ओ सैनिकाला ताब्यात घेतलंय. माणसाला युद्ध करुन अखेर काय मिळणार, कोणतंही युद्ध हे वाईटच वगैरे उदात्त विचार अजून त्यांच्या मनाला शिवलेले नाहीत. दोघंही कट्टर सैनिक आहेत, त्यामुळे त्यांच्या मनात डावपेच सुरु आहेत. अचानक आकाशातून लढाऊ विमानांचा आवाज येतो, ती वरतून जंगलावर घिरट्या घालत या हरवलेल्या पायलटला शोधत असतात. एक्स विमानांच्या आवाजाचा वेध घेण्यात गुंग झालाय हे पाहून ओ सैनिक तिकडे पळ काढतो. पण पळून पळून जाणार कुठे ? एक्स याला मागून गोळी मारतो. झालं... पुढल्या फ्रेममध्ये लंगडत चाललेला ओ दिसतो. या प्रसंगात एक कळतं की एक्स अचूक निशाणेबाज आहे, काय वाट्टेल ते झालं तरी याचा नेम काही चुकणार नाही. याचं प्रत्यंतर पुढंही येतंच. आणि त्यामुळेच तर ओ कधी त्याच्या तावडीतून सुटेल याची शाश्वती वाटत नाही. या दोघांचा एकमेकांशी असा हारजीतीचा खेळ सुरु आहे, जसा एखादा लोलक हलतो त्याप्रमाणे कधी यश कोणाच्या पारड्यात झुकेल हे सांगता येत नाही. जंगल अफाट विस्तारलेलं आहे. पुन्हा एकदा एक्स बंदूक घेऊन व त्याच्या पुढे ओ अशी वरात चालताना दिसते. दोघांच्याही चेह-यावर हे युद्धच सुरु आहे आणि हे असंच चालणार, त्यातून सुटका नाही असे भाव. अगदी ओ सैनिकाला देखील तो शत्रू सैनिकाच्या तावडीत आहे याचं काही फारसं वाटलेलं नाही. एकमेकांची सोबत ते एन्जॉय करतायत असंच वाटतं काही वेळा. एका ठिकाणी एक्स ओला थांबण्याचा इशारा करतो. मस्तपैकी सिगरेटचा झुरका मारतो, ती संपवून खाली टाकतो व ती चिरडून टाकण्यासाठी म्हणून पाय तिच्यावर ठेवतो. आणि येतो या शॉर्ट फिल्ममधला टर्निंग पॉईंट. या क्षणाला सारा खेळ जातो ओ सैनिकाच्या हातात. त्याची सुटकेची आशा पुन्हा जिवंत होते. त्याचा प्रयत्न तात्पुरता यशस्वीदेखील होतो. या शेवटच्या भागातले जे काही दोन-तीन प्रसंग आहेत त्यातला एक्सचा अभिनय खरंच अप्रतिम आहे. त्यानं दाखवलेल्या हावभावांना तोड नाही. हावभाव म्हटलं याचं कारण ही सायलेंट म्हणजे मूक शॉर्ट फिल्म आहे. यात एकही संवाद नाही. फक्त एक्स इशारा देण्यासाठी च्यक.. असा काहीसा आवाज तोंडाने काढतो तेवढाच. बाकी शॉर्ट फिल्म दोघांनीही अक्षरश: हावभावांवरती पेललीय. नशीब काय असतं आणि जीवन किती क्षणभंगुर आहे याचं पुरेपुर प्रत्यंतर याचा शेवट पाहताना येतं. फक्त दहा मिनिटं बावीस सेकंदाची शॉर्ट फिल्म. पण पाहताना आपण एकही फ्रेम चुकवण्याचा विचार करत नाही. या शॉर्ट फिल्मची दृश्यमांडणीच एवढी जबरदस्त आहे की तिला संवादाची गरजच भासत नाही. शिवाय अप्रतिम टेकिंग व सिनेमॅटोग्राफीची त्याला साथ आहे. एडिटिंग देखील एकदम परफेक्ट आणि शॉर्ट फिल्ममध्ये ते चांगलं जमलंच पाहिजे, तरच फायदा. शॉर्ट फिल्म संपताना क्रेडिट रोल दाखवतानाचा म्युझिक पीस मस्तच आहे. त्यातली एक वादक या दिग्दर्शक असिमचीच बहिण लेना वासिक आहे. जंगलातील पक्षी, बर्फवृष्टी, झाडं अशा व इतर काही प्रॉप्सचा दिग्दर्शक वासिकनं छान उपयोग करुन घेतलाय. त्याची एकूणच मेहनत ही शॉर्ट फिल्म पाहताना जाणवते. त्याचा प्रोड्युसर ल्युक वॉलपाथ त्याचं सर्व फिल्म फेस्टिव्हल्समध्ये तोंड भरुन कौतुक करतो. ही एक लो बजेट शॉर्ट फिल्म आहे यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. याचं कारण दिसणा-या सर्व गोष्टी जमवून आणण्यासाठी असिम वासिकनं कष्ट घेतले आहेत हे तो स्वत:च सांगतो. अगदी ज्यातून ओ सैनिक आकाशातून खाली उतरतो का पडतो ते पॅराशूट देखील प्रत्यक्ष दुस-या महायुद्धात त्याच्या मित्राच्या, आर्मीत असणा-या वडिलांनी वापरलेलं, ते या पठ्ठ्यानं या शॉर्ट फिल्मसाठी मिळवून आणलं. लो बजेट शॉर्ट फिल्म बनवायची तरी थोडाफार पैसा तर लागतोच, तो जमवायला वासिकला दिड वर्ष लागलं व त्यानंतर अवघ्या पाच दिवसांचं शूटिंग. पैसे जमवणं हीच त्याच्यासाठी मोठी समस्या होती. त्यातून प्रॉडक्शन कंपनी स्विस आणि हा सर्बियन. त्यामुळे स्वित्झलँडमध्ये शूटिंगसाठी याला सीमा ओलांडायला परवानगी मिळत नव्हती. अखेर मी फक्त एक कलाकारच आहे असं पटवून दिल्यावर याला फ्रिबोर्गच्या जंगलात सोडलं. तांत्रिक अंगांमध्ये वासिकनं कुठेही कसर सोडलेली नाही. अर्थात हे शक्य झालं ते पार्टिझनसारखी सर्वोत्तम प्रॉडक्शन कंपनी मिळाल्यामुळेच. शिवाय ही शॉर्ट फिल्म जगभरातील अनेक फिल्म फेस्टिव्हल्समध्ये नावाजली गेली त्याचं श्रेयही जातं ते त्यांनाच. २०१० सालची सर्बियाची ही एक उत्कृष्ट लो बजेट वॉर शॉर्ट. असिमनं नंतरही काही शॉर्ट फिल्मस् दिग्दर्शित केल्या आहेत. पण या वॉर शॉर्टनं त्याला आंतरराष्ट्रिय पातळीवर नेलं. युद्धावर आधारीत शॉर्ट फिल्मस खूप आहेत, मात्र त्यातून डार्क ह्यूमर नेहमीच आढळतो असं नाही. काहींनी प्रयत्न केलेले आहेत. अगदी सेव्हिंग प्रायव्हेट रायन्ससारख्या ऑस्कर विजेत्या युद्धपटाची खिल्ली उडवणारी शॉर्ट फिल्म देखील पहायला मिळते. पण युद्ध व आयुष्याचं तत्वज्ञान अशा गंभीर गोष्टींना उपहासात्मक विनोदाच्या छटेत मांडायच्या नादाला शॉर्ट फिल्ममेकर्स लागत नाहीत कारण कमी कालावधीत ते करणं कठीण असतं. त्यामुळे असिम वासिकचा हा प्रयत्न निश्चितच यशस्वी ठरतो. त्याच्या या शॉर्ट फिल्मच्या प्रत्येक फ्रेममधून, अगदी नावामधूनही काहीतरी अर्थ लागतो, तो ज्याचा त्यांनी घ्यायचा. ते प्रेक्षकांवर अवलंबून आहे. 

http://prahaar.in/relax/223566    Tags:  |  | 

No comments:

Post a Comment