Thursday, September 14, 2017

शॉर्ट फिल्म्सच्या दुनियेत (World of short films)

                                

सिनेमा माध्यमातलाच एक उपविभाग म्हणजे शॉर्ट फिल्मस् किंव लघुपट. दोन-अडीच किंवा अगदी साडे तीन तासांचा चित्रपटही प्रेक्षक न कंटाळता पाहतात परंतु कोणत्याही पूर्ण लांबीच्या सिनेमाइतक्याच मनोरंजक आणि तंत्रकौशल्य असणा-या शॉर्ट फिल्मसकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोन मात्र निराळा असतो. चित्रपटांइतक्याच हमखास आवडीने लघुपट पाहिले जात नाहीत. वास्तविक एखाद्या मोठ्या चित्रपटाला पुरेल इतक्या आशयाचा विषय घ्यायचा आणि त्याला अवघ्या १० ते ३० मिनिटांत मांडायचं म्हणजे आव्हानच असतं. तंत्रज्ञ, कलाकार, लेखक, छायाचित्रणकार, दिग्दर्शक अशा सर्वांच्याच प्रतिभाशक्तीची जिथे कसोटी लागते असं सिनेमाचं लघुरूप म्हणजे शॉर्ट फिल्मस्. जॉर्ज लुकास, टिम बर्टन, जॉन लॅसेस्टर, वेस अँडरसन यांसारख्या कित्येक नामवंत दिग्दर्शकांच्या चित्रपटसृष्टितील करिअरचा पाया शॉर्ट फिल्ममधूनच घडलेला आहे. लघुपटांचा पसारा आणि जीव छोटेखानी असला तरी विषय मांडणीत व रंजकतेत शॉर्ट फिल्मस् कुठेही कमी पडत नाहीत. शॉर्ट फिल्म म्हणजे जणू बुद्धि आणि प्रतिभा तासण्याची कानसच. आताच्या भाषेत सांगायचं तर चित्रपटांच्या विद्यापीठात प्रवेश घेण्याआधी द्यावी अशी सीईटी! अगदी नामवंतानांही लघुपट बनवून पाहण्याचा मोह आवरत नाही. आपल्याकडेही सुजॉय घोष, नीरज घेवन, अनुराग कश्यप, सुधीर मिश्रा, फरहान अख्तर या दिग्दर्शकांनीही शॉर्ट फिल्मस् बनवल्या आहेत. हल्ली तर अशा छोट्या कथांना जोडून मोठा चित्रपट बनवण्याचाही ट्रेंड येऊन गेलेला आहे. तरीही शॉर्ट फिल्मचं जगच वेगळं आणि त्यांचे चाहते असणारे प्रेक्षकही वेगळेच. लघुपटांचा कॅनव्हास छोटा वाटत असला तरीही अल्पखर्चात आणि कमी वेळेत एखादा विषय चित्रपटाच्याच ताकदीने प्रेक्षकांसमोर मांडायचा असेल, त्याचा दीर्घकाळ परिणाम व्हावा असं वाटत असेल तर शॉर्ट फिल्म्सना पर्याय नाही. शॉर्ट फिल्मसाठी कथानक खूप नेटकं व अगदी वनलाईनर म्हणता येईल अशा प्रकारातलं असावं लागतं. मग या वनलाईनर कथेवर दिग्दर्शकाला खेळायचं असतं. त्यातच तर खरी मजा असते. शॉर्ट फिल्मचं वैशिष्ट्य त्यांच्या साधेपणातच असतं. मोठ्या चित्रपटांइतकं बजेट व दिखावा दोन्ही त्यांच्याकडे नसतं. शॉर्ट फिल्मस् बनवण्यातला एक आनंद म्हणजे वैविध्य. अनेक विषय वेगवेगळ्या पद्धतीने मांडून हे वैविध्य त्यात राखता येतं. रुपेरी पडद्याच्या भाषेत लिहिलेली कलाकृती ही एक प्रकारे अजरामरच असते व ती उत्तम असेल तर रसिकांच्याही मनात कायमचं घर करून राहते. प्रेक्षकांच्या मनात असं स्थान मिळवण्यासाठी हजारो शॉर्ट फिल्ममेकर्स प्रयत्न करत असतात. हे सतत प्रयोगशील राहाण्याचं एक माध्यम आहे. इथे नावीन्य आजमावण्यासाठी आकाश अगदी मोकळं असतं. तरूणांना शॉर्ट फिल्मचं हे माध्यम नेहमीच आव्हान देत असतं. आशय मांडणीत व चित्रांकनात लघुपटांचं सारं यश सामावलेलं असतं.
This article has been previously published in Maharashtra Dinman newspaper on the date 03/04/2017

No comments:

Post a Comment